Monday, June 18, 2007

घनतमी शुक्र बघ राज्य करी

घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

ये बाहेरी अंडे फोडूनी
शुद्ध मोकळया वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी

फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नूरे, डौलात तरु डूले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

मना वृथा का भिसी मरणा
दार सुखाचे ते हरी करुणा
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहू कवळण्या उरी

No comments: